⁠ 
मंगळवार, मार्च 19, 2024

जळगाव जिल्ह्यातील या गावात दिले जातात टाळ-मृदंगासह वारकरी भजनाचे धडे

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ फेब्रुवारी २०२३ | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी पाया रचलेल्या वारकरी संप्रदायाने परंपरा जपून काळानुरूप बदल स्वीकारले आहेत. वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर, आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील एका गावातही ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांना वारकरी शिक्षणाचे बाळकडू पाजले जाते. हे चिमुकले टाळ-मृदंगासह वारकरी भजनाचे धडे गिरवत स्वत: हातात टाळ घेत वारकरी ठेका घेतात.

सद‍्गुरु श्री जोग महाराज यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे १९१७ मध्ये विद्यार्थ्यांना शुल्क अन् शिक्षकांना पगार नाही या तत्त्वावर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून वारकरी संप्रदायाच्या अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच तत्त्वावर आजपर्यंत ही संस्था कार्यरत आहे. संत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी येथे आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. यादरम्यान या वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाला कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी तयार करून दिले. आळंदीसह पंढरपूर, देहू, पैठण येथे अनेक वारकरी संस्थांमध्ये काही प्रमाणात संतसाहित्याचे शिक्षण दिले जाते. याच पंगतीत अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाचा समावेश होतो.

अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावातील गावातील १२५ वर्ष जुन्या श्रीराम मंदिरात तुळशीराम चौधरी, सुकलाल चौधरी, प्रल्दाद, महाजन, सुपडू कुंंभार, भाऊलाल महाजन, हिलाल चौधरी, दोधू चौधरी यांनी भजनाची परंपरा सुरु केली. आता त्यांचे नातू आणि पणतू ही परंपरा जपत आहेत. ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुले दररोज रात्री श्रीराम मंदिरात टाळ हातात धून नाचक गात वारकरी ठेका घेतात. आळंदी संस्थानचे विद्यार्थी सुनील महाजन, एकनाथ चौधरी, निवृत्ती चौधरी, विजय महाजन, नथू चौधरी, सतीश राजपूत हे बालकांना वारकरी भजनाचे धडे देतात.