⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

आयफोनच वापरा…उध्दव ठाकरेंच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांना सुचना, पण का?

जळगाव लाईव्ह न्यूज | २ फेब्रुवारी २०२३ | फोन टॅपिंग आणि फोन हॅकिंगच्या पार्श्‍वभूमीवर सावध भूमिका घेत उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षातील मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार, खासदारांच्या पीएसह सर्व स्टाफला फक्त आयफोन (iPhone) वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. आता अनेकांना प्रश्‍न पडला असेल की, आयफोन हॅक करता येत नाही का? त्याची सुरक्षा अ‍ॅन्ड्रॉइड फोन पेक्षा वेगळी कशी असते? यामुळे आज आपण आयफोन अ‍ॅन्ड्रॉइड (Android) फोन पेक्षा जास्त सुरक्षित का मानले जातात? याची माहिती साध्या भाषेत समजून घेणार आहोत.

राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (phone tapping) प्रकरणानंतर सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील महत्वाच्या लोकांना आयफोन वापरण्याच्या सुुचना दिल्या आहे. याआधी पेगासस (pegasus) स्पायवेअर सॉफ्टवेअरमधून मोठे वादळ उठले होते. पेगासस सॉफ्टवेअर वापरून मोबाईल हॅक करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी मोबाईल फोनवर सेलोटेप लावून पत्रकार परिषद घेतल्याने यावर मोठी चर्चा झाली होती.

भारताची लोकसंख्या सुमारे १४० कोटी आहे, तर १२० कोटींच्या वर मोबाइल वापरकर्ते आहेत, त्यापैकी सुमारे ३० कोटींकडे स्मार्टफोन आहेत. ५ ते १० वर्षांपूर्वी जिथे डेस्कटॉप हॅकर्सचे लक्ष्य होते, आज त्यांचे लक्ष्य स्मार्टफोन आहे. खरे तर ते त्यांचे सॉफ्ट टार्गेटही आहे. कारण स्मार्टफोनमध्ये लोड केलेल्या अ‍ॅप्सद्वारे ते सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. यामुळे सर्वाधिक सुरक्षित फोन कोणता, अ‍ॅपल का अ‍ॅन्ड्रॉइड? असा प्रश्‍न उपस्थित होतो. सुरक्षेसाठी आयफोनला सर्वाधिक पसंती दिली जाते. हॅकर्स त्यांना सहज लक्ष्य करू शकत नाहीत.

तज्ञांच्या मते, अँड्रॉइडपेक्षा अ‍ॅपल अधिक सुरक्षित आहे. कारण अ‍ॅपलमध्ये सुरक्षा थोडी अधिक मजबूत आहे. कारण अ‍ॅपल तुमच्या फोनला स्वतःहून कोणतेही अ‍ॅप चालवू देत नाही. आयफोनसाठी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर विकसित करते, जे अ‍ॅपल कंपनीने तयार केले आहे, ज्याला आयओएस म्हणतात. अ‍ॅपल आपल्या हार्डवेअरपेक्षा आयओएस ला जास्त महत्त्व देते. अ‍ॅपल त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी आणि गोपनीयतेसाठी प्रसिद्ध आहे. तो तुमचा वैयक्तिक डेटा कधीही कोणाशीही शेअर करत नाही किंवा तुमच्या डेटाशी कधीही तडजोड करत नाही. अ‍ॅपलने अमेरिकेची तपास संस्था सीआयएलाही फोनचा डेटा देण्यास नकार दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

आयओएस (iOS) साठी सर्व अ‍ॅप्स अ‍ॅपलच्या स्वतःच्या देखरेखीखाली विकसित केले जातात आणि कठोर चाचणीनंतरच अ‍ॅप स्टोअरवर ठेवली जातात. आयओएस अ‍ॅप्समध्ये, अ‍ॅन्ड्रॉइड प्रमाणे परवानगी देण्याची सक्ती केली जात नाही. अ‍ॅपल तुमचा वैयक्तिक डेटा जाहिरात कंपन्यांना विकत नाही. हे मुख्य कारण आहे की आयफोन महाग आहेत. याशिवाय, एकदा तुम्ही लेटेस्ट आयफोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला पुढील सहा ते सात वर्षांसाठी नवीन ऑपरेटिंग सॉफ्टवेअर अपडेट्सचा सपोर्ट मिळतो, ज्यामुळे तुमचा फोन नेहमी अपडेट राहतो.

अँड्रॉइड फोन पहिल्यांदा उघडला की त्यात अनेक नको असलेले अ‍ॅप्स दिसतात. हे अ‍ॅप्स अनेकवेळा नुकसानदायी ठरतात शिवाय ते फोनच्या परफॉर्मन्सवरही परिणाम करतात. अनेक तृतीय पक्ष अ‍ॅप्स आपोआप डाऊनलोड होतात आणि काही अ‍ॅप्सला डिलीट करणे देखील कठीण होते. परंतु आयफोनमध्ये फक्त काही प्री-इंस्टॉल केलेले अ‍ॅप्स दिले आहेत आणि आम्ही ते सहजपणे अनइंस्टॉल करू शकतो. अँड्रॉइड फोनमध्ये सिस्टीम अपडेट करणे खूप क्लिष्ट आहे. अ‍ॅपल फक्त त्याच्या आयओएस डिव्हाइसेसना थेट अपडेट पुरवते.