⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | गुन्हे | Untold Story : राजकीय दबावाला न जुमानता कर्तव्य बजावणारा ‘कुमार’

Untold Story : राजकीय दबावाला न जुमानता कर्तव्य बजावणारा ‘कुमार’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्हा कोणताही असो त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे दिव्य पोलिसांना पार पाडावे लागते, त्यातल्या त्यात जळगावसारखा एखादा राजकीय वजन असलेला संवेदनशील जिल्हा असला कि जास्तच डोक्याला ताप. जळगाव शहराला लाभलेल्या अशाच एका खमक्या अधिकाऱ्याची नुकतेच बदली झाली. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने पदोन्नती मागितली ती थेट ‘गडचिरोली’. जळगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक डॅशिंग कार्य आणि कारवाया पूर्ण केल्या आणि विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला त्यांनी दाद दिली नाही.

जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी एक पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, एलसीबी निरीक्षक, स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे लागते. जिल्ह्यातील महत्वाचे शहर असलेल्या जळगाव आणि भुसावळात गुन्हेगारी, राजकारण जास्त असल्याने जबाबदारी वाढते. जळगाव शहर जिल्ह्याचे केंद्रबिंदू असल्याने शहराकडे सर्वांचे लक्ष अधिक असते. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे कर्तव्य पोलीस अधीक्षकांसोबत प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधिक्षकांना पार पाडावे लागते.

जळगाव शहराला आजवर अनेक उपविभागीय पोलीस अधिकारी लाभले त्यातल्या त्यात गेली तीन टर्म पार पाडणारे अधिकारी सचिन सांगळे, डॉ.नीलाभ रोहन आणि मावळते अधिकारी कुमार चिंथा यांनी आपली जबरदस्त छाप सोडली. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा कित्ता त्यांनी गिरवला. काही पुढाऱ्यांशी वाद देखील झाले पण तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. विशेषतः सार्वजनिक गणेश उत्सव आणि विसर्जन मिरवणूक प्रसंगी जवळपास सर्वांचेच वाजले होते. कुमार चिंथा यांच्या बाबतीत काही वेगळे असे नाही.
हे देखील वाचा : एसपी साहेब, चला उठा… अधिकारी, कर्मचाऱ्यांना एनर्जीचा बूस्टर डोस द्या!

जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारताना कुमार चिंथा यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आणि एक प्रकारची भीती देखील गुन्हेगारांच्या आणि उपद्रवी समाजकंटकांच्या मनात होती. पदभार स्वीकारल्यावर लागलीच ते कामाला लागले. आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांना भेट देत हिस्ट्रीशिटरची यादी त्यांनी मागवली. सर्वांना बोलावून ओळख परेड घेत आपल्या पद्धतीने दम भरला. गुन्हेगार देखील काय समजायचे ते समजून गेले. अवैध धंदे चालक आणि मालकांशी पुढाऱ्यांशी असलेली सलगी लक्षात आल्यावर देखील कुमार चिंथा यांनी माघार घेतली नाही.

जळगाव उपविभागात अवैध धंदे मालकांमध्ये तर कुमार चिंथा यांची दहशत इतकी होती कि त्यांचे वाहन कार्यालयातून निघताच ते कुठे जाते याची माहिती देखील ते घेत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा आपल्या कोणत्याही राजकीय जुगाड आणि जॅकला भीक घालणार नाही हे माहिती असल्याने अवैध धंदे स्वतःच्या जोखमीवर चालवले जात होते. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील तशी कल्पना अवैध धंदे चालकांना देत होते. कुमार चिंथा यांच्या बदलीसाठी जवळपास सर्वच अवैध धंदे चालकांनी देवाला साकडे घातले होते. बदली कधी होणार याचीच ते प्रतीक्षा लावून होते. एखाद्या ठिकाणी अवैध धंदा सुरु असल्याची माहिती मिळाली आणि त्याठिकाणी कारवाई केली नाही असे कुमार चिंथा यांच्या कार्यकाळात कधीच झाले नाही.
हे देखील वाचा : एसपी साहेब, खडसेंचा आरोप खरा आहे का? पोलिसांना हफ्ते घ्यायला वेळ आहे?

शहरात अनेक ठिकाणी मोठे वाद झाले, जातीय तणाव निर्माण झाला, दगडफेक झाल्या, खुनाच्या घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती कळताच कुमार चिंथा काही क्षणात त्याठिकाणी पोहचत होते. चिंथा येणार समजताच समाजकंटक अगोदरच तिथून गायब व्हायचे, काही राहिलेच तर त्यांना पोलीस प्रसाद देत कुमार चिंथा यांनी कारागृहाची हवा दाखवली आहे. बऱ्याचदा तर मातब्बर गुंडांची रस्त्यावरून धिंड काढत त्यांनी प्रसाद दिला आहे. विशेषतः गेंदालाल मील परिसरात चिंथा यांची जोरदार दहशत होती. कुठेही कोणतीही घेताना घडली तर आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांची वाट न पाहता कुमार चिंथा सर्वात अगोदर धाव घेत होते. बऱ्याचदा तर स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या अगोदर चिंथा किल्ला लढवत उभे असायचे.

गेल्यावर्षी एका जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर कुमार चिंथा यांना राज्याच्या एका मोठ्या मंत्र्याने फोन केला होता, परंतु चिंथा आपल्या कारवाईवर ठाम होते. मध्यंतरी शहरात एका गुन्ह्यात दोन दिग्गज तरुण पुढाऱ्यांना चिंथा यांच्या पथकाने दमदार प्रसाद दिल्यावर देखील एका नेत्याने फोन केला होता मात्र सर्व कारवाई झाल्यावरच चिंथा यांनी फोन घेतला. एरंडोल येथे एका आरोपीला पकडताना चिंथा मोजक्या कर्मचाऱ्यांसह त्याचा पाठलाग करीत होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी धरणगाव येथे पाठवली पण तोवर चिंथा यांनी मोहीम फत्ते केली होती.
हे देखील वाचा : खबऱ्यांचे भाव वाढले, शासनाचे घटले.. पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करावी तरी कशी?

आपल्या कार्यकाळात कुमार चिंथा यांनी जळगावात अनेक मोठ्या कारवाई केल्याने गुन्हेगारांसह राजकीय पुढारी देखील धास्तावले होते. एखाद्या अधिकाऱ्याची गडचिरोली येथे बदली होणे म्हणजे शिक्षा असे समजले जाते मात्र कुमार चिंथा यांनी स्वतःहून गडचिरोली बदली मागून घेतली, त्यावरूनच त्यांच्यातील डॅशिंगपणा लक्षात येतो. कुमार चिंथा हे नाव खरोखर कौतुकास्पद असून जळगाव शहराला यापुढे देखील तशाच खमक्या अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात देखील पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह सर्वांनी कुमार चिंथा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला यावरूनच त्यांचे कार्य लक्षात येते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.