⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

शेतकऱ्यांवर अवकाळीचे ढग कायम ; ‘या’ तारखेपासून निवळणार संकट?

जळगाव लाईव्ह न्यूज न्यूज । ६ मार्च २०२३ । सध्या राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान,आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यावरील अवकाळीचे संकट ८ मार्चनंतर निवळू शकते.

हवामान खात्याकडून 5 ते 8 मार्च दरम्यान राज्यातील काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच गारपिटीची शक्यता देखील वर्तविली आहे. त्यानुसार मागील गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या असलेल्या अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर परिसराला विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. धुळे जिल्ह्यात गारपीट झाली आहे. जळगावच्या देखील काही भागांत शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यात रविवारी‎ सकाळपासूनच तब्बल ७० टक्के‎ आकाश ढगांनी व्यापले हाेते.‎ सकाळी शहरात काही भागात‎ पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ‎ वातावरणामुळे रविवारी उन्हाची‎ तीव्रता खुपच कमी झालेली हाेती.‎ आज सोमवारी देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

उद्या या भागात गारपीटीची शक्यता?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मराठवाडा-विदर्भ भागांवर वादळी पावसाचे संकट आहे. 7 मार्चला दाेन्ही विभागांत गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात कमाल तापमान 38 अंशापुढे जात असताना 4 मार्चपासून वातावरण ढगाळ झाले आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या असलेल्या अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. 8 मार्चनंतर अवकाळीचे वातावरण निवळू शकते.

शेतकऱ्यांवर अवकाळीचे ढग
दरम्यान, काही ठिकाणी झालेल्या अवकाळीमुळे गहू, कांदा, हरभरा यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या या नुकसानामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे. त्यात अद्यापही शेतकऱ्यांवर अवकाळीचे ढग कायम आहे. राज्यावरील अवकाळीचे संकट ८ मार्चनंतर निवळू शकते.