⁠ 
रविवार, मे 5, 2024

जळगावसह राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२४ । हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत गारपीट अन् मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम काढणीची वेळ आली असताना गारपीट आणि पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात आला आहे. अवकाळीचं हे संकट पुढील काही दिवस कायम राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे

विदर्भ आणि खान्देशात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. जळगाव जिल्ह्याच्या देखील अनेक भागात सोमवारी रात्री वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. जिल्ह्यातील चाळीसगाव तसेच अमळनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली. पारोळा तालुक्यात भिलाली गाव तसेच इतर गावांमध्ये तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं गारपीट झाल्याची माहिती आहे. चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसला.. जळगाव शहरात रात्री १०:५० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी व कांद्याचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच मंगळवारी (२७ फेब्रुवारी) आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आलाय.

कोणकोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पाऊस?
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजनुसार, मंगळवार २७ आणि बुधवार २८ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.