जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । सध्या राज्यात कुठे ऊन, कुठे थंडी तर कुठे पाऊस असे हवामान तयार झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहण्याची शक्यता असून त्यामुळे ऐन थंडीच्या मोसमात राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत कोकण, विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा 10 अंशांच्या वर गेला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार असल्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे. दरम्यान, ५ जानेवारीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असून पुण्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील नागपूरसह अन्य जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोमवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. गोंदियातील तापमान १२.४ अंश सेल्सिअस इतके होते. हवामान खात्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ५ जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तरेकडील राज्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मंगळवार आणि बुधवारी हलका पाऊस पडू शकतो.