जळगाव लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वच प्रथा निराळ्या आणि निसर्गाला अनुसरून आहेत. आदिवासी समाजातील विवाह परंपरा तर फारच अनोखी आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली विवाह परंपरा आजही आदिवासी बांधवांनी जपून ठेवली आहे. एरव्ही आपण नेहमी ऐकतो कि हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाला, विवाहितेने जीव दिला. मात्र आदिवासी समाजात याच्याच उलट प्रथा आहे. जसे अन्य समाजात ‘वधू’ पक्षांकडून ‘वर’ पक्षाला देहज (हुंडा), महागडी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे.तसेच आदिवासी समाजात लग्नापूर्वी ‘वर’ पक्षांकडून वधू पक्षालाला देहज ‘हुंडा’ दिला जातो. त्यातल्या त्यात आदिवासी समाजातील प्रत्येक उपजातीमध्ये देहजात ‘हुंड्यात’ दिल्या जाणाऱ्या रकमेचा आकडा देखील वेगळा आहे. जळगाव आणि खान्देशात देखील या प्रथेचा अबलंब केला जातो.
देशाच्या नव्हे जगाच्या पाठीवर आजही आदिवासी समुदायाला निसर्गाचे पुजारी मानले जाते. आदिवासी समाज पूर्वीपासूनच निसर्गाच्या सान्नीध्यात रहिवास करून राहत असून वेळोवेळी निसर्गाची पूजा देखील करीत असतो. आदिवासी समाजात महिलांना देखील सन्मानाचे स्थान आहे. सिमेंटच्या जंगलात जगणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यातील लग्न परंपरा म्हणजे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करणे, विवाह जुळणी संकेतस्थळावरून योग्य जोडीदाराची निवड करणे, नातेवाईकांची घरी बैठक करून हुंड्याची इतर बोलणी करणे., वर पक्षाने वधू पक्षाला हुंडा देणे, तिथी निश्चित करीत मोठा धांगडधिंगा करणे असेच काही असते. हुंड्याच्या रकमा तर कुठे लाखोंची उड्डाणे घेतात आणि हुंड्याची पूर्तता न झाल्यास सुरु होतो विवाहितेचा छळ, घटस्फोट आणि आत्महत्या. आदिवासी समाजात असेच काही चित्र आहे पण ते काहीसे उलट आणि सकारात्मक असल्याचे जाणवते.
आदिवासी समाजात होळीच्या सणाला मोठे महत्व आहे. होळी सणानंतर आदिवासी समाजात मुलगी पसंत करण्याच्या कार्याला सुरवात होते. मुलगी पसंत झाल्यावर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती (आदिवासी भाषेत डाया), पाचपंच मिळून लग्न जुळवण्यासाठी मुलीच्या घरी बोलणं करतात. मुलीकडची मंडळी आणि पंचांनी होकार दिल्यानंतर तारीख, वार, वेळ निश्चित केली जाते. त्यानंतर दोन्ही पक्ष (वर-वधू) जोमाने तयारीला लागतात. घरातील काही सदस्य बाहेर गावी असल्यास त्यांना दोन-तीन दिवसा अगोदर बोलविले जाते. जेणेकरून घरातील काम करू लागतील. त्यानंतर नातेवाईकांना लग्नाची आमंत्रण देण्याची सुरुवात होते. आदिवासी समाजात लग्नाचे आमंत्रण हे त्या-त्या व्यक्तीच्या घरी बसून दिले जाते.
हे देखील वाचा : दोन वर्षात जळगाव जिल्ह्यात आल्या ५ फॉरेनच्या पाटलीन!
सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण दिल्यानंतर लग्न ठरलेल्या दिवशी सर्वजण वऱ्हाडी मंडळींची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. मुली लग्न गीते गाऊन आनंद व्यक्त करतात. तरूण-तरूणी ढोलच्या तालावर ठेका धरून फेर धरून नाचतात. वऱ्हाडी मंडळीचे आगमन झाल्यावर मोठ्या आदराने त्यांचे स्वागत करतात. पाणी, चहा झाल्यानंतर जाती रिवाजाप्रमाणे लग्नविधी पार पाडतात. लग्न विधी पार पाडताना एक प्रथा पार पाडली जाते ती म्हणजेच लग्न विधीत वर पक्षाकडून वधूपक्षाला देहज ‘हुंडा’ म्हणून काही साहित्य आणि रक्कम दिली जाते. आदिवासी समाजातील उपजात असलेल्या भिल्ल समाजात सध्या ९ ग्लास मोहूची दारू, ज्वारीचे धान्य, पैसे देहज (हुंडा) ५१ हजार ४९ रुपये वधू पक्षाला दिले जातात. तर पावरा समाजात वधूपक्षाला ११ हजार ४९ रुपये देण्यात येतात. त्यानंतर आहेर व भोजन (जेवण) करतात. सर्व लहान-थोर गावकरी मनसोक्त जेवणावर ताव मारतात. मुलीला (वधू)वर पक्षासोबत निरोप देतात.
देहज ‘हुंडा; म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कम आणि प्रथेची देखील एक वेगळी पद्धत आहे. आदिवासी समाजात दोन्ही पक्षाकडील मंडळी देहज ‘हुंडा’ देताना समजूतदारपणा दाखवतात. एखाद्या वर पक्षाची हुंड्यात मोठी रक्कम देण्यासारखी परिस्थिती नसल्यास वधू पक्ष समजून घेतो. काही ठिकाणी वधू पक्ष स्वतःच देहज ‘हुंडा’ घेण्यास नकार देतो. आदिवासी समाजातील वधूला देहज ‘हुंडा’ देण्याची ही प्रथा खरोखर आगळीवेगळी असून इतर समाजाने त्यांच्याकडून बोध घेत स्त्री सन्मान करणे आवश्यक आहे. एकीकडे हुंडाबळीच्या घटना आपण वारंवार ऐकत असतो दुसरीकडे मात्र आदिवासी समाजाने ठेवलेला हा आदर्श अतिशय कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे ही प्रथा आजची नसून वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. काळानुरूप आणि महागाईचा परिणाम देखील या प्रथेवर झाला असे म्हणायला हरकत नाही. जसजशे उत्पन्न वाढले, महागाई वाढली तशी हुंड्याची रक्कम देखील वाढत गेली आहे.
आदिवासी समाजातील पूर्वजांनी आणि जेष्ठांनी मोठा विचार करून घेतलेला निर्णय आज सर्वांना काहीतरी बोध घ्यायला लावत आहे. आदिवासी समाजातील विवाह सोहळा देखील तीन दिवस चालणारा एक आगळावेगळा उत्सवच असतो. विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात आणि घराच्या बाहेरच हा सोहळा पार पडत असल्याने सर्व क्षण कुटुंबियांना जवळून अनुभवता येतात. विवाह सोहळ्यात जेष्ठांचा मान मोठा असल्याने सर्व काही त्यांच्याच संमतीने केले जाते.