दुर्दुवी घटना : जळगाव जिल्ह्यात २ वर्षीय बालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । अंगणात खेळत असतानाच अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथ बुधवारी घडली. कार्तिक शशिकांत बडगुजर (वय 2) असे मयत बालकाचे नाव आहे.
पिंप्री येथील शशिकांत बाबूलाल बडगुजर यांचा कार्तिक बडगुजर हा दोन वर्षाचा मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंगणात खेळून झाल्यानंतर कार्तिक घरात आला व अचानक जमिनीवर पडला. हे पाहून कार्तिकचे आजोबा बाबूलाल बडगुजर यांनी नातवाला उचलले परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता त्यामुळे त्यांनी लागलीच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी लहान बालकाला तपासून मृत घोषित केले. हृदयविकाराने त्याचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले.
अतिशय गोंडस बालकाचा अचानक मृत्यू झाल्याने पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. मृत कार्तिक हा पेपर एजन्सी धारक बाबूलाल काशीनाथ बडगुजर यांचा नातू होय. बुधवारी दुपारी दोन वाजता मृत कार्तिकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.