दुर्दैवी : उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी टॉमॅटो फेकले रस्त्यावर !
जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : शेतकऱ्यांना लिलावात कमी भाव मिळाल्याने हे टोमॅटो जसेच्या तसे घरी नेण्याची वेळ बळीराजावर आली. टोमॅटोला निचांकी दर मिळत असल्याने नाशिकच्या पेठ रोड परिसरात असलेल्या शरदचंद्र पवार कृषी मार्केट यार्डच्या गेटवर शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून निषेध केला.
संकटांचा सामना करून मेहनतीने पिकवलेल्या बाजारात टोमॅटोची आवाक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी येथील बाजार समितीतच टोमॅटो ओतून निषेध केला. या दरातून वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी हा तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी उच्चांकी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढली. तसेच परराज्यातून असलेली मागणी घटली. त्यामुळे बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटोला प्रति क्रेट २० किलो ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः हताश झाला आहे.