जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर वनक्षेत्रातर्गत रुईखेडा वनपरीमंडळातील कोथळी येथील जुने मुक्ताबाई मंदीर परिसरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत एका हरीणाला ठार केल्याची दुर्देवी घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या घटनेने परीसरात वन्यप्राणी संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुक्ताईनगर येथील जुने मुक्ताबाई मंदीर परिसरात प्रवेशद्वाराशेजारी आज पहाटे कुत्र्यांनी लचके तोडलेल्या तसेच मृतावस्थेत एक हरीण ग्रामस्थांना दिसुन आले. या घटनेबाबत कोथळी येथील पोलीस पाटील संजय चौधरी यांनी तातडीने घटनास्थळ गाठुन स्थानिक वनाधिकाऱ्यांना ही बाब कळवली. वनविभागाचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दिपश्री जाधव, बी.एन पाटील, संचलाल पवार यांनी घटनास्थळी दाखल होत मृत हरीणाला पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. डुघ्रेकर, डॉ. अश्विनी दाभाडे यांनी मृत हरिणाचे शवविच्छेदन केले. दरम्यान कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्राव होऊन हरीणाचा मृत्यु झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत हरिणावर वनविभाकाकडुन अंत्यवीधी पार पडला.
अनेकदा शांत वातावरणाच्या वेळी पहाटे पाच-सहाच्या सुमारास हरिणांचा कळप मंदिर परीसरात पाणी पिण्यासाठी येत असल्याचे अनेक स्थानिकांनी बघितले असल्याची माहीती कळते. अशाच प्रकारे आज पहाटे आलेल्या कळपातील एक हरीण भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याने जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना घडली असल्याचा अंदाज स्थानिक गावकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. दिवसोदिवस जंगलपरीसरात वाढत चाललेला मानवी हस्तक्षेप याशिवाय जंगलातील कृत्रिम पाणवठ्यांची कमतरता यामुळे वन्यजीवांना जीव धोक्यात घालुन मानवी वस्त्यांची वाट धरावी लागत आहे.
कोथळी येथील पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असुन बंदोबस्त करावा. तसेच वनविभागाने जंगलात कुत्रिम पाणवठे यांची संख्या वाढवुन नियमितपणे पाणी टाकावे जेणेकरुन पाण्याची उपलब्धता जंगलातच झाल्यास वन्यप्राणी जीव धोक्यात घालून गावात येणार नाही. अशी मागणीवजा अपेक्षा होत आहे. दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई भवानी अभयारण्य व मुक्ताईनगर वनक्षेत्रातील रुईखेडा वनपरीमंडळात वन्यप्राण्यांची संख्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.सदर वनक्षेत्रात कृत्रिम पद्धतीने कुरणनिर्मिती वनविभागाने उपलब्ध करावी.