जळगाव लाईव्ह न्यूज : २० मार्च २०२२ : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, जिल्ह्यातील यावलसह रावेर व चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील १ हजार ३४३ हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील यावलसह रावेर व चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील हरभरा, बाजरी, मका, ज्वारी, केळीसह अन्य पिकांना फटका बसला आहे. यावल तालुक्यात शनिवार, 18 रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा नऊ गावातील 50 शेतकर्यांना फटका बसून 55.02 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर रावेर तालुक्यातील 36 गावातील 1012 शेतकर्यांकडील 829.25 हेक्टरवरील पिके बाधीत झाली. चाळीसगाव तालुक्यातील 16 गावांमधील 919 शेतकर्यांकडील 459 हेक्टरवरील शेती पिकांचे तसेच पाचोरा तालुक्यातील तीन गावातील 10 शेतकर्यांचे 4.20 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकार्यांनी दिली.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वरील चारही तालुक्यात गव्हासह मका पिकाला सर्वाधिक फटका बसला असून 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. चारही तालुक्यातील 64 गावातील एक हजार 991 शेतकर्यांच्या एक हजार 347.47 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.