दुर्दैवी : नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत कोळी यांचे अपघाती निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत भिकनराव कोळी वय-42, रा. उत्तम नगर,कोल्हे हिल्स यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी कानळदा रस्त्यावरील हॉटेल उत्कर्ष जवळ घडली. याच बरोबर धडक झालेला दुसरा दुचाकीस्वार सुद्धा गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे.
प्रशांत कोळी हे दुचाकीने जळगाव तालुक्यातील मूळ गावी नांद्रा येथे शेतात दुचाकीने गेले होते.रात्री शेतातून घरी परतत असताना कानळदा रस्त्यावरील उत्कर्ष हॉटेलजवळ समोरुन येणार्या दुचाकीचा व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रशांत कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
परिसरातील नागरिकांनी प्रशांत कोळी व दुस-या जखमी दुचाकीस्वाराला तातडीने नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती कोळी यांना मृत घोषित केले. तर दुस-या दुचाकीस्वारावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे