जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगावहून भऊर येथे घरी परतणाऱ्या तीन तरुणांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात ऊर येथील मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी एरंडाेल ते येवला महामार्गावरील बहाळ गावापासून ३ किलाेमीटर अंतरावरील वळणावर घडलीय. आकाश भिवसन मोरे (वय १८), अनिल संजय गायकवाड (वय १९) असे अपघातातील मृतांचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे भऊर गावात शाेककळा पसरली आहे. याबाबत उशिरापर्यंत मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.
याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील भऊर येथील आकाश मोरे, अनिल गायकवाड व विनोद विक्रम मोरे (वय १९) हे तिघेही तरुण दुचाकी (एमएच- १९, डिएच- ०१३५) ने रविवारी दुपारी चाळीसगाव येथे गेले होते. त्यांचे चाळीसगाव येथील काम आटोपून ते तिघेही रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भऊर गावाकडे निघाले. बहाळ, ऋषिपांथा-मार्गे भऊरकडे येत असताना बहाळ गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील वळण रस्त्यावर जामद्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात आकाश मोरे व अनिल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, अपघातातील मृत आकाश मोरे व अनिल गायकवाड मामा-भाचे होते. रविवारी दोघेही पुण्याला कामाच्या शोधासाठी जाणार होते. पुण्याला जाण्यापूर्वीच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी माेठा आक्रोश केला. उशिरापर्यंत मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.
अनिल गायकवाडची यंदा शेवटचीच ठरली भाऊबीज
अनिल गायकवाड याच्या घरची परिस्थिती गरिबीची असून त्याच्या पश्चात एक बहिण आणि आई-वडील असा परिवार आहे. अनिलची ही शेवटची भाऊबीज ठरली. तर घरातील कर्ता एकुलता एक मुलगा गेल्याने या कुटुंबावर दु:खाचा माेठा डाेंगर काेसळला आहे. तर आकाश मोरे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून घरातील ताेच कर्ता हाेता.