⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

जळगाव जिल्ह्याचे पुत्र असलेले उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ एप्रिल २०२३ | अमळनेर येथील रहिवासी असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास(संजय)महाले यांनी सेवा बजावत असताना छंद म्हणून संगीत विषयक आवड जपली .संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान दिले. त्यात अनेक अभूतपूर्व व अनेकार्थी ” हटके ” संगीतमय कार्यक्रम सादर केले. त्यात काही प्रयोग तर अक्षरशः स्वप्नवत तथा अकल्पनीय होते. या एकूणच कार्याची आणि संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत उल्हास महाले यांना दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने “संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

उल्हास महाले यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण अमळनेर येथे झाले आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे ते लहान बंधू आहेत. दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि नातसून मृदुला पुसाळकर यांच्या हस्ते १ एप्रिल रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे समारंभ पूर्वक उल्हास महाले यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, तैलचित्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध संगीतकार तथा गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनेक अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना उल्हास महाले म्हणाले की, संगीत ही आवड म्हणून मी कसोशीने जपली आहे. ताणतणावातून मुक्ती देणारे संगीत व्यापक व्यासपीठावर नेवून, त्या आधारे इतरांना शक्य होईल तेवढी संधी देत या क्षेत्रात देखील वावरतो आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कर्तव्य बजावताना जसे जसे शक्य झाले तसा तसा वेळ काढून संगीत दिग्दर्शन, सांगीतिक कार्यक्रम, लघुकथा दिग्दर्शन, पटकथा इत्यादी भूमिका बजावल्या. संगीत रचना आवड जपत १०० हून अधिक गझल, कविता लिहिल्या आहेत.

यावेळी डॉ. सलील कुलकर्णी, जयदीप बगवाडकर, केतकी भावे-जोशी यांनी एकाहून एक सुरेल गीत सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका गौतमी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.