जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची वाढती गर्दी आणि मिळणारा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने उधना–सुभेदारगंज दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीच्या फेऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खान्देशातील अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ या स्थानकांवर या गाडीला थांबा असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ०४१५६ उधना–सुभेदारगंज विशेष ही गाडी पूर्वी ३१ मार्चपर्यंत चालविण्यात येणार होती. मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन आता या गाडीची सेवा १४ जुलै २०२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता उधना स्थानकावरून सुटून विविध स्थानकांवर थांबे घेत दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता सुभेदारगंज येथे पोहोचते.

तसेच ०४१५५ सुभेदारगंज–उधना विशेष ही परतीची गाडीही पूर्वी ३० मार्चपर्यंत धावणार होती. या गाडीला आता १३ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ११.४० वाजता सुभेदारगंज येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.१५ वाजता उधना येथे पोहोचते.
या स्थानकांवर आहेत थांबे?
व्यारा, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, झांसी, ओराई, पोखरायण, गोविंदपूर आणि फतेहपूर.








