यावलमध्ये भरधाव डंपरने घेतला तरुणांचा बळी, नागरिकांचा संताप

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२३ । यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्यानजीक भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसरा जखमी झाला होता. मात्र जखमी तरुणाचा देखील उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.हे दोघे सावखेडा सिम येथील रहिवासी होते. दरम्यान, या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

नेमकी काय आहे घटना?
याबाबत अधिक असे की, सावखेडा सिम (ता. यावल) येथील अमोल राजेन्द्र पाटील (वय-२६) आणि ईस्माइल हबीब तडवी (वय-३०) हे दोघे दुचाकी (एमएच १९ डीबी २७४६) ने शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास किमगाव येथे जात होते. याच दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात अमोल पाटील हा जागीच ठार झाला तर इस्माईल हबीब तडवी हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या हबीबला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात करण्यात आले होते. परंतु ईस्माइल तडवी याचा उपचारादरम्यान रात्री १२, ३० वाजेच्या सुमारास प्राणज्योत मावळली. दरम्यान, यावल पोलीसांनी रात्री उशीरा या भिषण अपघातास कारणीभुत असलेल्या डंपर (क्रमांक एमएच १७ बी डी ३४६८) या वाहनास ताब्यात घेतले असून या डंपर वरील चालक मात्र फरार झाला आहे. असे पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले.

यावल तालुक्यात अवैध धंदे जोरात
दरम्यान, यावल तालुक्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. दारू, सट्टा, पत्तासह गुटका विक्री सर्रास सुरूय. तसेच अवैध वाळूची वाहतूक सर्रास सुरु असल्याचेही दिसून येतंय. मात्र, यावर महसूल असो कि पोलीस दादा असो यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येतेय. आता अशातच भरधाव डंपरने दोन तरुणांचा जीव घेतला आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर पोलिसांकडून काय कारवाई होते हे पाहणे गरजेचे आहे.