जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघातात इस्राईल शेख इरफान (वय २१, रा. अजिंठा) आणि पंकज हरीश बेंडवाल (रा. इंदूर) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

अपघातात प्रदीप ऊर्फ छोटू ओमप्रकाश परदेशी हा तरुण गंभीर जखमी झाला असून, गिरीश योगेश चव्हाण (वय २१, रा. खेडी), गौरव राजू परदेशी (रा. इंदूर) आणि अनुज रामावत परदेशी (वय २५, रा. खेडी) हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी कुटुंबातील हे तरुण बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. अजिंठा परिसरात त्यांची बांधकामाची साइट सुरू असून, त्या ठिकाणी जाण्यासाठी ते गुरुवारी सायंकाळी जळगावहून कारने निघाले होते. मात्र उमाळा घाटाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली आणि भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.










