जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२१ । जळगाव शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबतच नसून दररोज नवनवीन चोरटे एलसीबीच्या तावडीत सापडत असले तरी स्थानिक पोलीस स्टेशनवाले अद्यापही चोरांचाच शोध घेत आहे. दोन दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास झाल्यानंतर काल चक्क एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणाहून दुचाकी लंपास करण्यात आली आहे.
ममुराबाद येथील मनु तुकाराम बोरासे वय-३२ हे एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या लिग्रँड कंपनीत वायरमन म्हणून काम करतात. दि.१२ रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.एझेड.९५९७ ही लिग्रँड कंपनीबाहेरील पार्किंगला लावली आणि ते कामाला गेले. दुपारी ५ वाजता ते बाहेर आले असता दुचाकी दिसून आली नाही.
जवळपासच्या परिसरात त्यांनी शोध घेतला असता दुचाकी मिळून न आल्याने ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची त्यांची खात्री पटली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.