जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सातत्याने वाहन चोरी, घरफोड्याच्या घटना समोर येत आहे. अशातच अमळनेर शहरात चोरीस गेलेल्या कारच्या तपासासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या अमळनेर पोलिसांच्या पथकास बाहेर गावाहून चोरीस गेलेल्या दोन कार हाती लागल्या असून सदर कार ताब्यात घेऊन अमळनेरात आणण्यात आल्या आहेत.

२४ मे रोजी रात्रीच्या सुमारास अमळनेर शहरातील ओम साई श्रध्दा नगर येथील फिर्यादी प्रविण हरिश्चंद्र ठाकुर यांच्या मालकीची दिड लाखांची एक पर्पल पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची डिझायर कार घरासमोरून चोरून नेल्याने अमळनेर पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला.या कारचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर डीवायएसपी विनायक कोते यांच्या सूचनांप्रमाणे वाहनाच्या तपासकामी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन मधील गुन्हे अन्वेषण पथकाचे पीएसआय शरद बागल, नामदेव बोरकर, हवालदार विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के व उदय बोरसे यांना ६ जुलै रोजी मध्य प्रदेशात रवाना केले.

त्यानुसार या पथकास मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील सितामउ तालुक्यातील रावठी गावात या गुन्ह्यातील संशयित राहुल पाटीदार (पुर्ण नाव माहित नाही) याने त्याच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या गोडाउनमध्ये गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन लपवुन ठेवले असल्याचे आढळले. सीतामठ पोलिस स्टेशनकडील पोलिसांची मदत घेवुन संशयिताच्या घराची व गोडाउनची झडती घेतली असता त्या ठिकाणी इतर ठिकाणावरून चोरी केलेले एक टोयोटा कंपनीचे पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर वाहन व एक हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार मिळून आली. हे चारचाकी वाहने जप्त करून ती येथे आणले. त्यातील एक कार नागपूर तर दुसरी जळगाव येथील गुन्ह्यांमधील असल्याचे निष्पन्न झाले.










