जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयश्री राकेश शिंदे (वय १९) व नंदिनी राकेश शिंदे (वय १६) असे मृत बहिणींचे नाव आहे. या भयानक दुर्घटनेमुळे हिरापूर गावासह संपूर्ण चाळीसगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी राकेश शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह मालेगाव येथे एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून आनंदाने आपल्या गावी छोटा हत्ती वाहनाने परतत असताना, दहिवद फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

या भीषण अपघातात जयश्री शिंदे हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचे वडील राकेश शिंदे, आई, लहान बहीण नंदिनी शिंदे आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच लहान बहीण नंदिनी शिंदे हिचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन हसत्या-खेळत्या मुली गमावल्यामुळे संपूर्ण हिरापूर गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना आपले अश्रू अनावर झाले आहेत. या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी स्थानिक पोलीस करत आहेत.









