जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केलेल्या उमेदवारांना आज दुपारी ३ वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर यानंतर प्रत्येक मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातून आज दोन मातब्बर उमेदवारांनी माघार घेतली असून आता दोन मान्यवर रिंगणात उतरले आहेत.
यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहेत. यंदा चोपडा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या शिवसेनेकडून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी मिळाली असून शिवसेना-उबाठाच्या वतीने पहिल्यांदा राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. तथापि, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांची उमेदवारी बदलून ऐन वेळेस भाजप नेते तथा माजी जि. प. सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांना तिकिट मिळाले.
यासोबत माजी आमदार जगदीश वळवी आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. दरम्यान, आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी डॉ. चंद्रकांत बारेला व जगदीशचंद्र वळवी यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता मैदानात प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधात प्रभाकरआप्पा सोनवणे हे उरले आहेत. येथून अपक्ष तसेच अन्य लहान पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी देखील प्रमुख लढत ही या दोन मान्यवरांमध्येच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.