जळगाव लाईव्ह न्यूज । अपघात प्रकरणी आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पारोळा येथील दोन पोलिसांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. हिरालाल देवीदास पाटील (४३, रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) आणि प्रवीण विश्वास पाटील (४५, रा. पोलिस वसाहत, बसस्थानकाजवळ, पारोळा) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
तक्रारदार हे ७ नोव्हेंबर रोजी दुचाकीने पारोळ्याहून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांच्या दुचाकीची धडक होऊन त्यावरील चालक ठार झाला. याबाबत तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तक्रारदाराची अटक टाळण्यासाठी संशयित दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडे ३० हजाराची मागणी केली होती.
तडजोडीअंती १५ हजाराची मागणी झाली. त्यानुसार, प्रवीण विश्वास पाटील याने १५ हजाराची रक्कम घेतली. रक्कम घेताच त्याला अटक करण्यात आली. यातील दुसरा आरोपी पसार झाला आहे. याबाबत वरील दोघा संशयितांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.