⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | कापसाला भाव मिळेना, शेतकऱ्यांनी कापूस ठेवला घरातच; खान्देशात निम्मेहून अधिक जिनिंग उद्योग बंद

कापसाला भाव मिळेना, शेतकऱ्यांनी कापूस ठेवला घरातच; खान्देशात निम्मेहून अधिक जिनिंग उद्योग बंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाला मागणी नसल्याने कापसाचे भाव गडगडले आहे. कापसाला चांगला भाव मिळेल; या आशेवर शेतकरी आहेत. यामुळे कापूस घरात भरून ठेवला असून कापूस विकायला तयार नाहीत. परिणामी जिनिंग उद्योग देखील अद्याप ठप्प आहेत.

दरवर्षी दिवाळीपासून कापसाचा हंगाम सुरू होतो. डिसेंबरपर्यंत खान्देशात सुमारे तीन ते साडेतीन लाख गाठींची खरेदी होते. पण यंदा तशी परिस्थिती नाही. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर सुमारे दीडशे पैकी ७० ते ८० जिनिंग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. तर जे सुरू आहेत; ते देखील पूर्ण क्षमतेने सुरू नाही. बांगलादेश, व्हिएतनाम, चीन हे देश प्रामुख्याने भारताचा कापूस खरेदी करणारे देश आहेत. पण त्यांच्याकडूनही हवी तशी मागणी अद्याप होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. म्हणून कापसाची निर्यात ठप्प आहे.

बांग्लादेशात राजकीय अराजकता माजली आहे. त्याचा व्यापारावर परिणाम झालाय. शिवाय भारताच्या अनेक व्यापाऱ्यांचे सौदेही अडकले आहेत. कापूस आयात करून जिनिंग चालवायच्या तर भरमसाठ इम्पोर्ट ड्युटी मुळे तेही शक्य नाही. अशा परिस्थितीत कापूस मार्केटमध्ये मंदी दिसून येत आहे. शिवाय उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा; अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज सीसीआय साडेसात हजार रुपयांचा भाव देत आहे. पण जाचक अटींमुळे शेतकरी तिकडे जायला तयार नाहीत. परिणामी शेतकरी कापूस विक्रीला न काढता घरातच भरून ठेवत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.