मंत्रिमंडळाच्या बैठकीतून काँग्रेसचे दोन मंत्री एक्झिट ; सरकारच्या आशा मावळल्या?
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिला. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आली आहे. महाविकास आघाडीला बहुमत चाचणीसाठी उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रालयात उपस्थित आहेत. ही मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरु झाली असतानाच अवघ्या दोन मिनिटात काँग्रेसचे दोन मंत्री बैठकीतून बाहेर पडले आहे.
वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि अस्लम शेख हे मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानं चर्चेला उधाण आलंय. वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख बैठकीतून का निघून गेले, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतून घेतलेली एक्झिट म्हणजे सरकारच्या आशा मावळल्या आहेत का? असा सवालही विचारला जातोय.
मागील अडीच वर्षापासून सत्तेत असूनही शिवसेनेकडून याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिवसेनेनं हे दोन महत्वाचे प्रस्ताव सादर केले असण्याची शक्यता आहे. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचाही एक प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला जाण्याची शक्यता होती. मात्र, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काँग्रेस जोरदार विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात होती.