विहिरीतून कबुतर पकडणे दोन मुलांच्या जीवावर बेतले ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । जामनेर तालुक्यातील तळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे विहिरीतून कबुतर पकडण्यासाठी पाइपला बांधलेला दोर सुटल्याने दोन अल्पवयीन मुलांच्या आयुष्याचीच दोरी तुटली अन् त्यांना जीव गमवावा लागला. अनिकेत जितेंद्र जोहरे (वय १३) आणि अभय भागवत कोळी (वय १७, रा. तळेगाव ता. जामनेर) अशी या मृत बालकांची नावे आहेत.
सकाळी घरून दोर घेऊन घराबाहेर पडलेल्या दोघांची रस्त्यात मित्रांशी भेट झाली. तुम्हीही सोबत चला, असे त्यांनी सांगितले. पण, त्यांनी नकार दिल्याने ते दोघेच गावाबाहेर पडले. गावापासून काही अंतरावरील शेतातील विहिरीतून कबुतर काढण्यासाठी त्यांनी खाली दोर सोडला. तत्पूर्वी वरच्या बाजूला पाइपला दोरी बांधली. दोरीच्या साहाय्याने खाली उतरताना अचानक दोर खाली आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
दुपारपर्यंत मुले घरी परतली नाही, गावात लग्न सोहळे असल्याने ते आले नसतील, असे वाटल्याने नातेवाइकांनी सायंकाळपर्यंत वाट पाहिली. तरीही मुले परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली.मनाची हुरहुर वाढत असल्याने शोध सुरू झाला. ज्या मित्रांना ते भेटले, त्यांनी ते ज्या शेताकडे गेले तो रस्ता दाखविला आणि एका विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. शनिवारी दोघांवर गावातच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्या घरची परिस्थिती बेताचीच असून, अनिकेत पाचवीची व अभय हा आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते