जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । पश्चिम बंगालच्या दोन कारागिरांनी लाखो रुपयाचे दागिने घेऊन पसार झाले आहे. मध्यस्थाने बनविण्यासाठी दिलेले ९ लाख ७० हजार रुपये किंमतीचे १४३ ग्रॅम सोने घेऊन हे कारागीर पसार झाले असून ते १५ वर्षांपासून मध्यस्थाकडे कामाला होते. सहा महिने वाट पाहून अखेर सोमवारी रात्री त्यांच्या विरुध्द शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्यामसुंदर अंबालाल सोनी (वय ५८, रा. पटेल नगर, चर्च मागे, रामानंद नगर) हे सोने चांदीच्या दागिन्यांचे कारागीर आहेत. त्यांचे गोलाणी मार्केटमध्ये चौथ्या मजल्यावर मोहीत ज्वेलर्स नावाने दुकान आहे. सोनी यांनी १३ सप्टेंबर २०२४ रोजी रतनलाल सी. बाफना यांनी दिलेले ९७०४१३ रुपयांचे १४३.८६० ग्रॅम शुध्द सोने दुकानातील कारागीर संजय शंकर सांतरा (रा. घोरादहा, पोस्ट धन्याघोरी, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) याला ५४.०५० शुध्द सोने देऊन २ मोठे मंगळसूत्र बनविण्यास सांगितले होते. मुस्तफा अली (रा. बागनान, जि. हावडा, पश्चिम बंगाल) याला ६०.१७० ग्रॅम देऊन ४ छोटे मंगळसूत्र बनविण्यास सांगितले होते. १४ सप्टेंबर रोजी श्यामसुंदर व त्यांचे भाऊ नेहमीप्रमाणे दुकानावर आले असता दोन्ही कारागीर दुकानात नव्हते. दुकानात काम करणाऱ्या इतर ३ कारागीरांना विचारले असता त्यांनी आम्ही झोपलेले असताना ते रात्रीच त्यांचे सामान घेऊन निघुन गेल्याची माहिती दिली.
मोबाइल बंद आल्याने सहा महिन्यांनी गुन्हा केला दाखल
संजय सांतरा व मुस्तफा अली हे गेल्या १५ वर्षांपासून सोनी यांच्याकडे कामाला होते. दोघे कारागीर साहित्य घेऊन निघून गेल्याचे कळल्यावर सोनी यांनी दोघांना त्यांच्या मोबाइलवर संपर्क केला असता जरुरी काम आल्याने रात्री गावी निघून आलो. तुमचे सोने १० दिवसात जळगावात आल्यावर परत करु असे सांगितले. नंतर काही दिवसांनी दोघांचे मोबाइल नंबर बंद झाल्यावर सोनींना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली.