⁠ 
शनिवार, मे 4, 2024

दोन गावठी पिस्तूलसह दोघांना ठोकल्या बेड्या ; भुसावळातील कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२३ । भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून गावठी पिस्तूल विक्री व खरेदी करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एकूण ५ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की भुसावळ शहरातील मओएच कॉलनी परिसरातील हॉटेल मधू समोर गावठी पिस्तूल विक्री व खरेदीचा व्यवहार होत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारा पोलीसांनी सापळा रचला. त्यावेळी हॉटेलच्या बाजूला मोकळ्या जागेत संशयित आरोपी बंटी उर्फ पवन झरापकर रा. भुसावळ हा गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएल १९४४) ने आला.

त्यानंतर थोड्या वेळाने पिस्तूल घेण्यासाठी योगेश नंदू सांगळे (वय-२९) रा. नंदनवन कॉलनी , छत्रपती संभाजी नगर हा बोलेरो कार क्रमांक (एमएच १४ बीके ९०९४) घेवून आला. त्यावेळी पोलीसांनी छापा टाकला. यातील बंटी झरापकर हा पोलीसांना पाहून दुचाकी सोडून पसार झाला तर योगेश नंदू सांगळे याला अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन्ही वाहने जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी करीत आहे.