ट्रक चालकाला अडवून मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । चिंचोली येथून रिकाम्या बाटल्यांचा माल घेवून औरंगाबाद येथे जात असलेल्या एका ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबविल्याची घटना ५ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उमाळा घाटात घडली होती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांचा शोध सुरु आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील रहमेबाद येथील रहिवासी सोनाजी अशोक मिरगे (वय-३०) हे सतपाल शर्मा यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच. ४६, एफ. ५३४५)वर चालक म्हणून काम करतात. ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता ते जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील गोडावून मधून रिकाम्या बाटल्यांचा माल घेवून ट्रकने औरंगाबाद येथे जात होते. दरम्यान, रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उमाळा घाटात दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दुचाकी ट्रक समोर उभी करून ट्रक थांबविला. या चारही जणांनी चाकूचा धाक दाखवून पैसे दे असे सांगितले. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे मिरगे यांनी सांगितले. यावेळी या चारही जणांनी ट्रक चालकाच्या खिश्यातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले. या घटनेनंतर ट्रक चालकांने दुचाकीचा पाठलाग करून दुचाकीचा क्रमांक (एम.एच.१९, डी.ए. १२८३) लक्षात ठेवला होता. याप्रकरणी ट्रक चालक सोनाजी मिरगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राहत्या घरातून केली अटक
या गुन्ह्यातील दुचाकीच्या क्रमांकावरून दोन संशयित आरोपी हे नशिबराद येथील असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संशयित आरोपी राम मुकेश करोसिया (वय-२१, रा. भवानी नगर नशिराबाद) आणि राजेंद्र सुकलाल भोई (वय-२०, रा. निमजाई माता मंदीरनगर नशिराबाद) यांना गुरूवारी रात्री ९ वाजता राहत्या घरातून अटक केली. दोघांचा शोध सुरू आहे.