प्रवाशाला लुटणारे दोघे आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात; ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
जळगाव लाईव्ह न्यूज । २०२१ । भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅट क्रमांक सहावर डाऊन गोवा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाला धमकावत चौघांनी 34 हजारांची रोकड लांबवल्याची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून, आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर केले असता 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पसार दोघे आरोपी अखेर जाळ्यात
तक्रारदार प्रवासी महेंद्र जैतराम गौतम (18) हे 1 नोव्हेंबर रोजी ट्रेन क्रमांक 02779 डाऊन गोवा एक्स्प्रेसच्या इंजिन बाजूकडील जनरल डब्यातून प्रवास करीत असताना भुसावळ स्थानक आल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक सहावर गाडी उभी असताना चौघांनी गौतम यांच्या खिशातील पाकिटातून 34 हजारांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी आबीद शहा फकीर शब्बीर शहा (28) व रईस अहमद नबी अहमद (35, भुसावळ) यांना 3 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आल्यानंतर 28 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली होती तर याच गुन्ह्यात पसार असलेल्या नईम शहा उर्फ भुर्या रज्जाक शहा (30) व शाहरुख खान उर्फ भांजा इकबाल खान (23, दोन्ही रा.ग्रीन पार्क, भुसावळ) यांना सोमवारी अटक करण्यात आली. आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर केले असता 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, एएसआय भरत शिरसाठ, हवालदार दिवाणसिंग राजपूत, सागर खंडारे व आरपीएफ पथकाने केली. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय साळुंखे हे करीत आहेत.