⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Jalgaon Shivsena : जळगावातील शिवसेना नगरसेवक पुन्हा फुटले, शिंदे गटाला पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा गट स्थापन झाला आहे. दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याने भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले असून त्यात माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे. शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या एक दिवस अगोदर देखील जळगाव शहर मनपातील ६ नगरसेवकांनी मुंबई गाठत एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेला जळगावातून मिळालेला पहिला धक्का पचत नाही तोच आणखी ३ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

जळगाव मनपातील तीन नगरसेवकांनी गुरुवारी दुपारी माजी पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील यांची भेट घेत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेला (Shivsena) सत्ता गेल्यानंतर आणखी एक मोठा धक्का बसला असून ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के यांचा देखील समावेश आहे. या नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली व शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या ठाणे महापालिकेवर कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या पंचवार्षिकला ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ६६ नगरसेवक शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. ६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच आहेत. या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जळगाव मनपातील देखील नगरसेवक चेतन सनकत, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होतो. प्रसंगी मुंबईत खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतांना नगरसेवकांसोबत शिवसेनेचे हर्षल मावळे, नगरसेविका पती कुंदन काळे देखील उपस्थित होते.

Shivsena jalgaon coroprators

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे बंडखोर नगरसेवक ही त्यांच्या मागे बाहेर पडतील असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत असतानाच मनपातील सहा बंडखोर नगरसेवकांनी फटाक्यांची माळ फोडत शिंदेंना आपला पाठिंबा दर्शवला होता. शिंदे गटात ६ गेल्याने मनपात २३ असलेल्या बंडखोरांची संख्या १८ वर येऊन ठेपली होती. पक्षबळ कमी झाल्याने जळगाव मनपात शिवसेनेचे ३२ नगरसेवक राहिले होते. त्यात मूळ शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले १५ नगरसेवक आणि भाजपातून शिवसेनेमध्ये बंडखोरी करून आलेले १७ नगरसेवक अशी संख्या राहिली होती.

वर्षभरापूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे कुलभूषण पाटील यांना हाती धरत भारतीय जनता पक्षातून तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेत आणले आणि जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला. काही दिवसांनी त्यापैकी ५ नगरसेवक हे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याने बंडखोरांची संख्या २३ वर येऊन पोहचली होती. गेल्या आठवड्यात २३ मधील ६ नगरसेवकांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये न जाता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. जळगाव शिवसेना पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच नगरसेवक प्रवीण कोल्हे, उषा संतोष पाटील, सुनील पाटील हे देखील शिंदे गटात सामील झाले आहे आ.गुलाबराव पाटील यांची भेट घेत त्यांनी पाठिंबा जाहीर केला.