जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । ट्रकमध्ये गायींना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. यात सुमारे २ लाख ४० हजार रुपयांच्या बारा जर्सी गायींची सुटका करण्यात आली आहे. तर चौघांसह ५ लाख किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता असल्याचे समजते.
ही कारवाई मुक्ताईनगर पोलिसांनी तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ काल दि. १६ रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास केली. तालुक्यातून अनेकदा परराज्यातून गुरांची वाहतूक करणारी वाहने जात असतात. पोलीस अनेकदा या प्रकारच्या धडक कारवाया करत असतात. काल रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळून ( एचआर ५५ डब्ल्यू-८५६१ ) या क्रमांकाच्या ट्रकमधून गायींची अतिशय निर्दयीपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुरनाड फाट्याजवळ चापडा रचून सदर ट्रक अडविले, चालकासह चौघे जण ट्रक टाकून पळण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली.
साबीर इस्माईल (रा. बुराका जिल्हा नुह राज्य हरियाणा), अब्दुल सत्तार अब्दुल गफार ( ता. मावना जिल्हा किठोर उत्तर प्रदेश), वसीम आस मोहम्मद ( ता. सयीदपूर मोदी नगर उत्तरप्रदेश), साहिल खान सपात खान (ता.पोटला तह नूह उत्तर प्रदेश )असे चौघां आरोपींचे नाव आहे. अंकुश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भा, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित २००५ चे कलम ९, ११ (१); (ए); (एफ), (एच); (के); (आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ९ ११ आणि महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम ८३, १७७ प्रमाणे मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई पोलीस निरिक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरिक्षक शेवाळे, पोहका जवरे, अंकुश बाविस्कर, धर्मेंद ठाकूर यांच्या पथकाने केली. दरम्यान डोलारखेडा फाटा ते पुर्णा ब्रिज दरम्यानच्या रस्त्याच्या कडेने मुक्ताई भवानी अभायरण्याच्या वनहद्दीलगत कंटेनरमध्ये अमानुषपणे कोंबल्यामुळे मृत झालेल्या गायी बैलांचे मृतदेह वारंवार फेकले जात असतात. दर महीनाभरातुन रस्त्यावरुन ये- जा करतांना उग्र वास येतो. तसेच या प्रकारामुळे स्थानिक शेतकरी व वन्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीसांकडुन नित्यनेमाने संशयास्पद कंटेनरची कसुन तपासणी होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा वजा मागणी वन्यप्रेमीमधुन केली जात आहे.