⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आयुक्त मॅडमांच्या दालनात लागला टीव्ही, जळगावकरांच्या समस्या दिसणार का?

आयुक्त मॅडमांच्या दालनात लागला टीव्ही, जळगावकरांच्या समस्या दिसणार का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहराची अवस्था किती उजाड झाली आहे हे सांगण्याची गरज आता नागरिकांना उरलेली नाही. जळगाव शहरामध्ये ज्या गोष्टीचा मुळीच अभाव नाही ती गोष्ट म्हणजे समस्या. किंबहुना समस्या ही जळगाव शहरातल्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. अशावेळी जळगाव शहरातील नागरिक शहरातील नगरसेवकांना, शहराच्या आमदार, खासदारांना म्हणजेच लोकप्रतिनिधींना याबाबत खडेबोल सुनावत आहेत. मात्र अधिकाऱ्यांचं काय? जळगाव शहर महानगरपालिकेमधील अधिकारी जर चोख काम करत असते तर जळगाव शहरामध्ये समस्या राहिल्या असत्या का? याचं उत्तर आहे नाही. अधिकाऱ्यांवर ज्यांचा खऱ्या अर्थाने अधिकार आहे त्या म्हणजे जळगाव शहराच्या पहिल्या महिला आयुक्त विद्या गायकवाड (vidya gayakvad). मात्र सध्या आयुक्त अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात कमी पडत आहेत. आयुक्तांच्या दालनात टीव्ही लावण्यात आला असून मॅडम त्यावर राज्याच्या आणि जगाच्या घडामोडी बघत आहेत. आयुक्तांना राज्याचा आणि जगाचा आढावा टीव्हीवर मिळत असला तर शहराच्या समस्यांसाठी त्यांना प्रत्यक्ष गल्लोगल्लीच फिरावे लागणार आहे. यामुळे आयुक्त मॅडम आता राज्याच्या बातम्या सोडा आणि जळगावच्या स्थानिक समस्यांकडे जरा लक्ष द्या, असे म्हणण्याची वेळ जळगावकरांवर आली आहे. (Jalgaon muncipal corporation commissioner vidya gayakvad)

जळगाव शहरातील बरेच नगरसेवक हे बिन भरवशाचे झाले आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले १५ आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आणि इतर पक्षात उड्या न मारलेले १७ असे ३२ नगरसेवक सोडल्यास इतर नगरसेवकांवर जळगाव शहरातल्या नागरिकांचा विश्वास उरलेला नाही. अशावेळी या इतर सर्व नगरसेवकांवर नागरिक प्रचंड रोष व्यक्त करताना दिसत आहेत. नगरसेवक त्यांच्याच वॉर्डात राहतात यामुळे नागरिक नगरसेवकांना जाब देखील विचारू शकतात. मात्र जे अधिकारी, मनपा कर्मचारी आपल्याला दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत नाही, अशा कर्मचाऱ्यांना नागरिक काहीच बोलू शकत नाहीत. कारण कितीही म्हटलं तरी ते शासनाचे कर्मचारी असल्यामुळे त्यांना बोलायला नागरिक धजवतात. इतकंच काय तर अधिकारी, कर्मचारी नगरसेवकांना देखील जुमानत नाही अशी गत होऊन बसली आहे. कित्येकदा नगरसेवकांनी तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर अधिकाराने वचक बसवण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या खुद्द जळगाव शहराच्या आयुक्त विद्या गायकवाड या अधिकाऱ्यांवर वचक ठेवू शकत नाही आहेत.

जळगाव शहर महानगरपालिकेत उपायुक्त ठाण मांडून बसलेले असतात. शहरातील समस्या वाढल्या असून अशावेळी उपायुक्तांनी देखील शहरांमध्ये जाऊन याबाबत कार्यवाही करणे अपेक्षित असते. गेल्या दोन-तीन वर्षात कोविड असताना देखील उपायुक्त संतोष वाहूळे मैदानात उतरले होते. सध्या कोणतेही उपायुक्त शहरात फिरताना दिसत नाहीत. मात्र यांच्यावर ज्यांनी करडी नजर ठेवत यांना कामाला लावलं पाहिजे अशा आयुक्तही सध्या डॅशिंगपणा दाखवत नाही. सुरुवातीला काही दिवस बंदी असलेले प्लास्टिक उत्पादन विरोधात त्यांनी मोहीम चालवली होती. सध्या मात्र त्या दालनातच बसून टीव्ही बघत बातम्यांचा आनंद घेत कामकाज पाहत असल्याचे निदर्शनास येत आहे. मध्यंतरी तर नगरसेवक-आयुक्त अशी दरी निर्माण झाल्याची देखील चर्चा होती.

जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या व्यतिरिक्त जळगाव शहरामध्ये नक्की सुरू काय आहे? हे जाणून घेण्याची तसदी ही कोणी घ्यायला तयार नाहीये. अधिकारी व कर्मचारी नागरिकांचे व नगरसेवकांचे ऐकत नाहीत. अशावेळी हे सर्व लोक महापौर, उपमहापौरांकडे आपल्या तक्रारी घेऊन येतात. महापौर व उपमहापौर यांच्या तक्रारी ऐकून घेतात योग्य ते काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देतात आणि कार्यवाही देखील होते. मात्र नागरिकांना महापौरांकडे व उपमहापौरांकडे जाण्याची वेळ का येते? का म्हणून आयुक्त विद्या गायकवाड या अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात कमी पडत आहेत? याबाबतचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगत आहे.

जळगाव शहराचे माजी आयुक्त डॉ.सतीश कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यावर विद्या गायकवाड यांची आयुक्त म्हणून वर्णी लागली. जळगाव शहरामध्ये त्यांनी काम केलं असल्यामुळे आयुक्त म्हणून त्या चोख काम करतील अशी अपेक्षा होती. विद्या गायकवाड यांची निवड होण्यासाठी स्वतः नगरसेवकांनी देखील पाठपुरावा करत आयुक्त हे पद त्यांना मिळवून देण्यात मदत केली. सतीश कुलकर्णी यांच्या कार्यकाळातील कामे लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा संपूर्ण जळगावकर नागरिकांना व लोकप्रतिनिधींना होती. मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. काम रेंगाळली आहेत. विद्या गायकवाड लवकरात लवकर काम पूर्ण करतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात असं काहीही झालेलं दिसत नाहीये. जळगाव शहरातील रस्त्यांची कामे, जळगाव शहरातील अतिक्रमण समस्या, आरोग्यवस्थेची समस्या, जळगाव शहरात सर्वत्र झालेली घाण आणि पसरलेलं घाणीचं साम्राज्य, जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये न होणारी भरती व अनुकंपा धारक उमेदवारांना न मिळणारी हक्काची नोकरी. हे सर्व प्रश्न अजूनही जैसे थे आहेत. यामध्ये काडीचीही प्रगती झालेली नाही.

बैठकांवर बैठका
महानगरपालिकेतल्या तेराव्या मजल्यावरच्या आयुक्त दालनामध्ये रोज कोणती ना कोणती बैठक सुरूच असते. अशावेळी कित्येकदा नागरिकांना आयुक्तांची भेट घेण्याची वेळ माहित नसल्यामुळे नागरिकांना तासंनतास बाहेर थांबावं लागतं. मात्र या सुरू असलेल्या बैठकांमुळे निष्पन्न काही होतंय का? तर असही नाही. कागदपत्रांमध्ये नक्कीच काही ना काही निष्पन्न होत असेल मात्र अस्तित्वात काहीही दिसत नाही.

रस्ते जैसे थे
बांधकाम विभागातर्फे जळगाव शहरामधील रस्त्यांची काम अजूनही झालेली नाहीत. याबाबत मनपा प्रशासनाने आतापर्यंत बांधकाम विभागाला लवकरात लवकर हे काम पूर्ण करा असे सांगायला हवे होते. मात्र पूर्ण उन्हाळा निघून गेला. अर्धा पावसाळाही मात्र रस्त्याची काम सुरू झालीच नाहीत. विविध अडथळ्यांनी जळगाव शहरातील नागरिक रोजच कंबरेचे लचके तोडत प्रवास करत आहेत. स्वतःच्या शरीराची आणि स्वतःच्या वाहनाची वाट लावून घेत आहेत. मात्र त्यांना रस्ते काही मिळत नाहीत. अशावेळी बांधकाम विभागावर जरा अंकुश ठेवत लवकरात लवकर काम पूर्ण व्हायला हवी होती. मात्र हे करण्यात आयुक्तांना सपशेल अपयश आला आहे. याचबरोबर रस्त्यांचे खड्डे त्वरित बुजवा असे आदेश आयुक्तांनी दिले. मात्र ते खड्डे कशा प्रकारे बुजवले जात आहेत? याकडेही आयुक्त लक्ष देत नाही आहेत. त्यामुळे कोणीही येतंय रस्त्याची खड्डे बुजवतोय आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा खड्डे पडतात.

घनकचरा प्रकल्प
जळगाव शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा घनकचरा प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. महासभेतच्या पटलावर घनकचरा प्रकल्प मंजूर झाला मात्र प्रशासकीय बाबींमध्ये अजूनही हा अडखळून पडला आहे. अशावेळी प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कोणाची? तर आयुक्तांची. मात्र अजूनही हा प्रकल्प पुढे जात नाहीये.

नागरिकांना न मिळत असलेली भेट
जळगाव शहरातले नागरिक आपल्या समस्या घेऊन कित्येकदा आयुक्तांना भेटायला जातात. त्यांनंतर तक्रारी करतात की, आयुक्तांची भेट आम्हाला मिळत नाही. नागरिक कित्येकदा आंदोलनाला बसतात अशावेळी आयुक्त आपल्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन आपल्या आंदोलन स्थळी भेट देतील अशी अपेक्षा नागरिकांची असते मात्र आयुक्त ती भेट ही नाकारतात.

न होत असलेले शहरातील दौरे
जळगाव शहरामध्ये विविध समस्या असताना या समस्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या डोळ्यांनी दिसतात. कारण सर्वसामान्य नागरिक नेहमीच या ठिकाणी ये जा करत असतात. मात्र आयुक्त जळगाव शहराचा फेरफटका घेताना दिसत नाहीत. यामुळे जळगाव शहरातला नागरिकांना नक्की कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते आयुक्तांना माहित नाही. अशावेळी नागरिकांचा आयुक्तांशी थेट संबंध येत नसल्याने आयुक्तांवर नागरिक प्रचंड नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ते शेवटी नागरिकचंन . आयुक्तांची नाराजी? त्यांना थोडी परवडणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह