⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

८ लाखांच्या मालासह जळगावातून ट्रक लांबविला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । शहरातील अजिंठा चौफुली परिसरात रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवला. या ट्रकमध्ये आठ लाख रुपयांचे कपडे, प्लायवूड, ऑटो पार्टस, काॅम्प्युटर पार्टस, इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. एमआयडीसी परिसरात ट्रक आणि ट्रकमधील साहित्य, डिझेल चोरीच्या घटना नेहमीच होत असतात तरीही पोलीस प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाय केला जात नाही.

जळगावातील जमुनानगर येथील दीपक पंडित हळदे यांच्या मालकीचा हा ट्रक क्रमांक एमएच.१५.एजी.६३९९ आहे. त्यांना दि.१७ ऑक्टोबर रोजी रावेर, सावदा येथे काही वस्तू पाठवण्याची ऑर्डर होती. त्यानुसार दि.१६ रोजी सायंकाळी ट्रकचालक सर्फराज उर्फ गुड्डू अहमद तडवी याने बळीरामपेठेतून रेडिमेड कपडे, प्लायवूड, ऑटो पार्ट‌्स, काॅम्प्युटर पार्ट‌्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खुर्ची, तेलाचे कार्टून, पाइप, हार्डवेअरचे सामान असा आठ लाख रुपयांचा माल ट्रकमध्ये भरला. चालकाने रात्री ११.३० वाजता त्याने हा ट्रक अजिंठा चौफुली परिसरात रस्त्याच्या कडेला उभा केला. ट्रक पूर्णपणे ताडपत्रीने झाकला होता.

दरम्यान, दि.१७ रोजी सकाळी ७ वाजता ट्रकचालक सर्फराज तडवी अजिंठा चौफुली परिसरात आला असता त्याला ट्रक दिसून आला नाही. त्याने याबाबत तात्काळ हळदे यांच्या भावाला कळविले. दोघांनी लागलीच जळगाव, धुळे येथे जाऊन भंगार बाजारात ट्रक शोधला असता ट्रक मिळाला नाही. ट्रक उभा केलेल्या जागी एक सुरक्षारक्षक रात्री ड्यूटीवर होता. त्याला विचारणा केली असता सकाळी सहा वाजता एक तरुण हा ट्रक सुरू करून घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी हळदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ लाख रुपयांचा माल व एक लाख रुपयांचा ट्रक असा नऊ लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्यात नोंद करण्यात आले आहे.