गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे संत सावतानगरात वृक्षारोपण!
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । शहरातील शेतकी शाळेमागील बाजूला असलेल्या संत सावता नगरमधील दोन खुल्या भुखंडावर आज सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील ८० वर्षाच्या आजीसह नातवंडांनी वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा घेतली. आयुक्त विद्या गायकवाड यांनी प्रतिज्ञा देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित वृक्षारोपणा प्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, मनपा अभियंता प्रकाश पाटील, योगेश वाणी, अतुल वाणी, पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप पाटील, नगरसेवक प्रतिभा पाटील, श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित पर्यावरण जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संत सावतानगर गजानन पार्क गट नं. ७६०/७६१ या दोन खुल्या भुखंडामध्ये निंब, करंज, गुलमोहर, चिंच, पिंपळ, बकूड, पुत्रवंती, बदाम, बुच अशी १२० झाडे लावण्यात आली. यावेळी परिसरातील मनोहर महाजन, नितीन पाटील, राहुल पाटील, श्रीकृष्ण देशमुख, गजानन शुरपाटने, भागवत कोशे, परशुराम बडगुजर, राजेंद्र भावसार, राजेंद्र महाजन, विशाल भावसार, महेश पवार, बाळकृष्ण साळुंखे, स्वप्निल पाटील, प्रविण चौधरी यांच्यासह ८० वर्षाच्या आजी जनाबाई चौधरी, विजुबाई नन्नवरे, रूपाली पाटील, भावेश बाविस्कर, विशाल वाणी, लकी या चिमुकल्यांनी सहभाग घेतला. आयुक्त विद्या गायकवाड यांनी उपस्थित पर्यावरण प्रेमींना वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा दिली.
भावेश व लकी या दोघांनी घरातील कचरापासून खत तयार करून त्यापासून झाडांचे संगोपन करत असल्याचे आयुक्त विद्या गायकवाड यांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी दोघांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले. अतिन त्यागी, सुधीर पाटील, विजकुमार वाणी यांनी जागतिक तापमान वाढ त्यामुळे होणारी हानी याविषयी अवगत करत वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. जैन इरिगेशनच्या गार्डन टिम मधील रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. वसंत पाटील यांनी आभार मानले.