बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

VIDEO | रावेरहुन पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट, सुदैवाने अनर्थ टळला

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ नोव्हेंबर २०२३ | रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात. याच दरम्यान, रावेर मधून पुण्याकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना रावेर तालुक्यातील विवरा जवळील निंभोरा फाट्याजवळ घडली. मात्र प्रवाशांना तत्परतेने खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत असे की, साई सिद्धी ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ४० एन ५३६१) रावेर येथून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता २० प्रवाशांना घेऊन निघाली. वाटेत सुकी नदीच्या पुलाजवळ बसचे टायर फुटले. त्यामुळे बसने अचानक पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी प्रवासी पटापट खाली उतरले. काहीजणांचे साहित्य बसमध्ये राहिल्याने ते आगीत खाक झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सावदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सपोनि जालिंदर पळे हे करीत आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये सावदा येथून काही प्रवासी बसणार होते. सावदा गाव येण्यापूर्वीच बसने पेट घेतला.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/669769408612963