जळगाव जिल्हाजळगाव शहर

पारदर्शी रुग्णसेवेमुळे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले : पालकमंत्री

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील विकासासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा मिळत असून डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले. प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, अधिसेविका प्रणिता गायकवाड आदी उपस्थित होते.

सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पालकमंत्री ना. पाटील यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीद्वारे मंजूर सामान्य नागरिकांसाठीचे प्रसाधनगृह व शौचालय, दंतशल्यचिकित्सा कक्षाचे नूतनीकरण तसेच श्रवण क्षमता तपासणी कक्षाचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी रुग्णालयातील शिस्तबद्ध नियोजन पाहून कौतुक केले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांना विविध प्रकल्पांची, योजनांची माहिती दिली.

यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या म्यूजियमचे आणि विद्यार्थ्यांसाठीच्या प्रसाधनगृहाचे पालकमंत्री ना. पाटील यांनी उदघाटन केले. यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आता विविध सोयी-सुविधा उपलब्ध झालेले आहेत. यामुळे निश्चितच गैरसोय दूर झालेली असून डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक आहे. विद्यार्थ्यांसाठी असणारे म्युझियम देखील त्यांच्या अभ्यासाला उपयोगी पडणारे आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी उपअभियंता सुभाष राऊत, जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामदास वाकोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विविध विभागांच्या जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांचेसह एसएमएस निरीक्षक अजय जाधव, प्रकाश पाटील, मंगेश बोरसे, जितू करोसिया, सुधीर करोसिया आदींनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button