जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२४ । फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत असून अशातच चाळीसगाव येथील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तुमचा देशविघातक कृत्यात समावेश आहे. त्यात तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. आम्ही सीबीआय अधिकारी आहोत. तुमचा ऑनलाइन जबाब घेतो. तुमची गुन्ह्यातून सुटका करून घ्यायची असल्यास पैसे पाठवा’, असे सांगून महिला डॉक्टरकडून तब्बल साडेआठ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चाळीसगावच्या या महिला डॉक्टरला ११ व १२ जून दरम्यान सुनीलकुमार व अनिल यादव नावाच्या दोघांनी संपर्क करून आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. महिला डॉक्टरला तुमच्या मोबाइल नंबरचा देशविघातक गुन्ह्यात संबंध आढळून येत आहे. त्यात सीबीआयच्या हाती एक पार्सल लागले आहे. त्यात १५ बनावट पासपोर्ट व १४० ग्रॅम एमडी पावडर आहे. तुम्हाला या गुन्ह्यात किमान तीन वर्षे शिक्षा होईल. यातून सुटका करवून घ्यायची असल्यास आरटीजीएसने पैसे पाठवा. त्यासोबत व्हिडिओ कॉलवरूनच तुमचा जबाब नोंदवून घेतो, तुम्हाला दिल्लीला येण्याची गरज नाही, असे सांगितले.
त्यानुसार डॉक्टर महिलेने बँक खात्यातून ८ लाख ५० हजार रुपये समोरच्या दोघा भामट्यांच्या खात्यावर पाठवले; परंतु नंतर त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने सायबर पोलिसांच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच जळगाव सायबर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून दोन्ही भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत. दरम्यान, सायबर ठग विविध आमिष देऊन फसवणूक करीत असून, नागरिकांनी सावध राहावे.