जळगाव लाईव्ह न्यूज । नळीतून तोंडाने डिझेल ओढणे जीवावर बेतले आहे. या दुर्दैवी घटनेत उपचारादरम्यान एका तरुण चालकाचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील पिंप्री फत्तेपूर येथे घडलीय. सलीम गुलाब तडवी (३४) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे घटना?
पिंप्री फत्तेपूर येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेले सलीम तडवी हे ट्रॅक्टर चालवून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजता ते आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत होते. कॅनमधील डिझेल टाकण्यासाठी त्यांनी नळीचा वापर केला. कॅनमधील डिझेल नळीने ओढत असताना अचानक दाब वाढला आणि मोठ्या प्रमाणात डिझेल त्यांच्या तोंडातून थेट पोटात गेले. काही क्षणांतच त्यांना उलटी, मळमळ व तीव्र अस्वस्थता जाणवू लागली.

डिझेल पोटात गेल्याचे लक्षात येताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी सलीम तडवी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले. गेली चार दिवस अतिदक्षता विभाात उपचार सुरू असताना अखेर रविवारी पहाटे १२.३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अवघ्या ३४ व्या वर्षी तडवी कुटुंबातील कर्ता पुरुष जग सोडून गेल्याने पिंप्री फत्तेपूरसह परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.











