उद्या जिल्ह्यात ‘इतक्या’ वाजेपर्यंत सर्व मद्य विक्री दुकाने, हॉटेल बंद …जाणून घ्या कारण
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यातील वरणगाव येथे एका हॉटेलमध्ये दारू पीत बसलेल्या दोघांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या हॉटेल मालकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याने ते जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली होती. वाढत्या गुंडगिरीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, बिअर शॉपी, बार, हॉटेल चालकांनी उद्या दि.२५ रोजी दुपारी १ पर्यंत आपल्या आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटना आणि मद्य विक्री सेल्स टीमची यात मोठी भुमिका आहे.
वरणगाव येथील महामार्गालगत असलेल्या हॉटेल पारसमध्ये टेबलावर मद्य सेवन करताना दोन ग्राहकांमध्ये वाद झाला होता. वाद सोडविण्यासाठी हॉटेल मालक ज्ञानदेव हरी झोपे हे गेले असता एकाने त्यांच्याच डोक्यात बियरची बाटली फोडली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री करणारे दुकान, हॉटेल, परमीट रूम याठिकाणी मद्यपी वाद घालत असतात त्यामुळे होणाऱ्या परिणामांना आस्थापना मालकांना सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार घडत आहेत.
वरणगाव येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या दि.२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने, बियर शॉपी, बार, हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव जिल्हा वाईन मर्चंट असोसिएशनने घेतला आहे. बंद काळात कुणीही दुकान, हॉटेल सुरू ठेवल्यास ५ हजारांचा दंड देखील करण्यात येणार आहे.