जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२६ । महाराष्ट्रात मे महिन्याच्या मध्यातच उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्यानं मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला आणि जळगाव येथे झाली. राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये १३ मे रोजी जळगाव शहर हे अकोल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. अकोल्याचे तापमान ४५.९ अंश होते, तर त्या खालोखाल जळगाव शहराचा पारा ४५.६ अंशावर होता. गेल्या दोन दिवसांत जळगावच्या तापमानात जवळपास तीन अंशांनी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
विशेष चिंतेची बाब म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सरासरी तापमानात ४ अंशांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात जळगावचा पारा ४० अंशांच्या आसपास होता, मात्र यंदा सुरुवातीलाच त्याने चाळीशी ओलांडून ४५ अंशांकडे कूच केली आहे.
आज या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट
आज नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा आणि नांदेड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः नांदेडमध्ये तापमान ४१ अंशांपर्यंत गेल्याने नागरिक हैराण झाले असून पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







