⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

सर्वसामान्यांना आणखी एक झटका ! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्युज | १९ मे २०२२ | आधीच दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यात आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ (LPG Cylinder price hike) केली आहे.आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी दरवाढ असून या दरवाढीमुळे जळगावात 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1008 रुपयांवर गेली आहे.

12 दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीने भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. जळगाव यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमतीने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये इतका झाला आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरही महागला
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरासोबतच व्यवावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 19 किलो गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईत 2507 रुपये इतके मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

तर 1 मे रोजी यामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी मार्च महिन्यात दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2012 रुपये इतकी होती. 1 एप्रिलला 2253 रुपये इतका दर होता तर 1 मे रोजी हा दर 2355 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 750 रुपयांनी वाढ झाली आहे.