⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सोने दरात पुन्हा वाढ, चांदी घसरली ; आताचे भाव तपासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले आणि मोडीत काढले. ऐन लग्नसराईच्या हंगामात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अक्षरशः घाम फुटला. या आठवड्याच्या पहिल्या अन् दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र काल बुधवारी यात वाढ दिसून आली. दुसरीकडे चांदीत घसरण झाली.

या आठवड्यात सोमवारी 22 एप्रिल रोजी सोने 550 रुपयांनी कमी झाले. मंगळवारी 1530 रुपयांनी सोने आपटले. बुधवारी हा भाव 450 रुपयांनी वधारला. आता 22 कॅरेट सोने 66,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यापासून चांदीत घसरणीचे सत्र आहे. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली होती. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. या आठवड्यात 22 एप्रिल रोजी चांदी 1 हजारांनी घसरली. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांनी चांदी दणकावून आपटली. बुधवारी पण किंमतीत नरमाई होती. सध्या एक किलो चांदीचा भाव 82,000 रुपये आहे.

काही दिवसांपूर्वी सततच्या वाढीमुळे सोन्याची किंमत ७५,००० रुपयांवर झेप घेईल असे दिसत होते तर दरांनी ७४,००० रुपयांची विक्रमी पातळीही ओलांडली. मात्र अलीकडच्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.