जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । लग्नात खर्च झालेले साडेचार लाख रुपये माहेरहून परत आणावे अशी मागणी करीत एका पतीने पत्नीला मारहाण केली. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने फरशी साफ करण्यासाठी वापरले जाणारे हार्पिक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायत्री चेतन कोळी (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी पोलिसांत तक्रार दिली. गायत्री हिचे लग्न चेतन शांताराम कोळी याच्याशी झालेले आहे. सोमवारी (१८ जुलै) चेतनने पत्नी गायत्री हिला त्याची बहीण प्रियंकाच्या घरी घेऊन जायचे होते. गायत्रीने सोबत येण्यास नकार दिला. या कारणामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. यात चेतनसह त्याची आई कल्पना कोळी यांनी गायत्रीला मारहाण केली. लग्नात खर्च झालेले साडेचार लाख रुपये आत्ताच्या आता माहेरहून परत घेऊन ये अशी मागणी केली.
गायत्रीने नकार दिल्यानंतर चेतन, कल्पना कोळीसह नणंद प्रियंका हिने देखील मारहाण केली. या त्रासाला कंटाळून गायत्रीने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारानंतर तिची प्रकृती सुधारली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यावरुन चेतन कोळी, कल्पना कोळी व प्रियंका कोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.