⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

नदीत पोहायला जाणे पडले महागात; कावड यात्रेतील तीन तरुण भाविकांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३। श्रावण सोमवार निमित्त रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले एरंडोल येथील तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ ऑगस्ट रोजी घडली. सागर अनिल शिंपी(२५), अक्षय प्रवीण शिंपी (२१), पियुष रवींद्र शिंपी (२०) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पोहायला गेलेले असताना पाण्याच अंदाज न आल्याने तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास हि घटना घडली. तिघे युवक एरंडोल येथील भगवा चौक या परिसरातील रहिवाशी असून त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एरंडोल येथील सुमारे दीडशे युवक सोमवारी भल्या पहाटे भगव्या चौकापासून वाजत गाजत रामेश्वर येथे कावड यात्रेला निघाले होते. सदर यात्रा ही रामेश्वर येथे दोन वाजेच्या सुमारास पोहोचली, तिथे पोहोचण्याचा कुटुंबियांना युवकांनी कॉलवरून कळविल्याचे सुद्धा कुटुंबीयांनी सांगितले.

सागर शिंपी हा कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण असून तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंब निराधार झाले आहे. मृत सागरचे आई-वडील हे कामानिमित्त नाशिक येथे गेले असून घरी त्याचे फक्त आजोबा आहेत. अक्षय हा बारावी आयटीआय झालेला असून गेल्या सात वर्षांपासून तो विशाल ड्रेसेस हे स्वतःचे दुकान भावासोबत सांभाळत होता. पियुष शिंपी हा देखील बारावी आयटीआय झालेला होता व वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत होता. हे तिन्ही कुटुंब नातेवाईक आहेत. आणि तिघेही तरुण अविवाहित होते.

दरम्यान रामेश्वर येथे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे युवकांच्या मृतदेह शोधण्यासाठी पोलीस प्रशासन व आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. व पट्टीचे पोहणाऱ्याकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून युवकांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.