जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याच्या गृह विभागाने काल मंगळवारी (२३ जून) पोलीस दलात मोठे फेरबदल करत राज्यातील २२४ पोलीस निरीक्षकांना (PI) पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त (DySP/ACP) पदावर तात्पुरती पदोन्नती जाहीर केली आहे. या अंतर्गत जळगाव जिल्ह्यात तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची इतरत्र बदली झाली आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक सुनिल रामराव पाटील यांचा समावेश असून त्यांची चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जळगाव वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना पदोन्नती देत पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय), जळगाव या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत असलेले प्रमोद वाघ यांची मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या उपविभागांना नवीन नेतृत्व मिळाले आहे.
याचबरोबर जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गोराडे यांनाही पदोन्नती मिळाली असून त्यांची नाशिक येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये डीवायएसपी पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत असलेले डीवायएसपी ब्रम्हदेव शेळके यांची कळवण उपविभागात बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह प्रशासकीय फेरबदल झाले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या बदलांचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







