गॅस पेटविताच आगीचा भडका ; एकापाठोपाठ तीन घरे जळाली, कुटुंबीय उघड्यावर
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२४ । अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. गॅसगळतीने आगीचा भडका होऊन एकापाठोपाठ तीन घरांना आग लागल्याची धक्कादायक घटना करणखेडा (ता. अमळनेर) येथे घडलीय. दरम्यान, या आगीत दोन घरे पूर्णतः खाक झाली तर एका घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे तेरा लाखांचे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते
करणखेडा येथे बापूराव राजधर धनगर यांच्या पत्नी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना गॅस पेटविताच अचानक आगीचा भडका झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घर माती तसेच लाकडाचे असल्याने संपूर्ण घराने पेट घेतला.
यानंतर शेजारील आसाराम राजधर धनगर, सुनील आत्माराम गुरव यांच्याही घराला आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. नगर परिषदेला फोन करून आगीचे वृत्त कळवताच अग्निशमन बंब करणखेडा येथे पोचला. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे, वाहनचालक फारुख शेख, फायरमन मच्छिंद्र चौधरी, वासीम पठाण यांनी आग विझविली.
दरम्यान, या आगीत दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली. बापू धनगर व आसाराम धनगर यांच्या घरातील कपडे, फ्रीज, टीव्ही तसेच घरगुती साहित्य खाक झाले. घराचे धाबे खोदल्याने त्यांना राहायला जागादेखील राहिली नाही. तसेच सुनील गुरव यांनी त्यांचे घर स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य ठेवण्यासाठी दिले होते. त्याही घराला आग लागल्याने सर्व धान्य जळून खाक झाले. मंडलाधिकारी सुरेश चौधरी, तलाठी संगीता भोसले यांनी पंचनामा केला. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन पाहणी केली. आगीत तिन्ही घरे मिळून सुमारे तेरा लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, या आगीत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
उद्ध्वस्त कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करण्याचा सूचना
दरम्यान, ही घटना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांना कळताच त्यांनी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आचारसंहितेची अडचण येत नसल्याने उद्ध्वस्त कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करावे आणि एक महिन्याचा किराणा द्यावा, अशी सूचना केली.