⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

घरवापसी करणाऱ्या नगरसेवकांना धमकी, आ.गिरीश महाजनांकडे केली तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । शहरातील भाजपातील ९ बंडखोर दोन दिवसांपूर्वी पुन्हा भाजपात परतले. भाजपच्या या खेळीने शिवसेनेच्या इच्छा धुळीस मिळाल्या असून घरवापसी करणाऱ्या नगरसेवकांना धमक्या दिल्या जात असल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, हा प्रकार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिला असता त्यांनी धमकी देणाऱ्याचा पूर्व इतिहास माहिती असून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जळगाव मनपाच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच घडामोडी घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने आपला झेंडा फडकावला होता. गेल्या आठवड्यात भाजपाचे ३ बंडखोर पुन्हा भाजपात परतले. बुधवारी मनपात होणाऱ्या महासभेत शिवसेना आणि बंडखोर नगरसेवक विविध समित्यांवर आपल्या जवळच्या सभापतींची निवड करणार होते मात्र त्यांचा डाव फसला आणि भाजपचा डाव यशस्वी ठरला.

महासभेत झालेल्या गदारोळनंतर सभा तहकूब करण्यात आली. भाजपातील ९ बंडखोर पुन्हा स्वगृही परतले. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर सावत्रपणाची वागणूक देत असल्याचा आरोप करीत त्यांनी घरवापसी केली. शिवसेनेच्या पदांच्या आशा धुळीस मिळाल्यानंतर घरवापसी करणाऱ्या नगरसेवकांना काही जणांनी धमकाविले असल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारी जळगावात असलेले माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या कानावर नगरसेवकांनी घडलेला प्रकार घातला असता आ.महाजन यांनी धमकाविणाऱ्याचा पूर्व इतिहासच समोर मांडला. भाजपातील कुणालाही धमकाविण्याचा प्रकार घडला तर मग काही खैर नाही अशा शब्दात बैठकीत आ.महाजन यांनी समाचार घेतला आहे.