⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

यंदा जळगाव लोकसभेतील मतदानाचा टक्का वाढला ; कोणाला होणार फायदा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । सोमवारी चौथ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. यात गेल्या वर्षीपेक्षा जळगाव लोकसभा मतदार संघातील टक्केवारीत वाढ दिसून आली. यंदा जळगावमधील मतदानाची टक्केवारी ५७.७० टक्के इतके आहे. गेल्या वर्षी ५६ टक्के मतदान झाले होते. एकंदरीत या वर्षी एक ते दीड टक्क्यांनी मतदान वाढले आहे.

मतदानाचा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना की, विरोधकांना फायदेशीर ठरणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे उन्मेश पाटील तब्बल साडेचार लाखांच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. यंदा अशी काही लाट दिसून येत नसली, तरी नरेंद्र मोदी यांच्याच नावावर मतदान भाजपने मागितले. त्यामुळे हा ‘करिष्मा’ कायम ठरल्यास भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो

दुसरीकडे विरोधी शिवसेनेने भाजपचाच व्यक्ती फोडून त्यांना उमेदवारी दिली, तसेच विद्यमान खासदारही विरोधी पक्षात होते. याशिवाय जळगाव लोकसभा मतदारसंघातील तीन शिवसेनेचे आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभुतीही होती. त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का ठाकरे गटालाही फायदेशीर ठरू शकतो.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप मित्रपक्ष महायुतीच्या स्मिता वाघ व शिवसेना (उबाठा), मित्रपक्ष महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यात खरा सामना आहे. मतदारसंघानिहाय मतदान पाहिल्यास करण पवार यांच्या एरंडोल-पारोळा मतदारसंघात तब्बल ६१.६६ टक्के इतके मतदान झाले. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या अमळनेर मतदारसंघात ५५.९४ टक्के मतदान झाले होते.

ही आकडेवारी तशी निकाल ठरविणारी नाही व अंदाज दाखविणारी नाही. त्यामुळे मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील मतदानाचा विचार करावा लागणार आहे. मतदारांचा उत्साह आणि वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना घातक असतो, असे पारंपरिक गणितावरून म्हटले जाते. मात्र, अनेकवेळा हे पारंपरिक गणितही टिकली नसल्याचे दिसते. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का मतदानाच्या निकालाबाबत संभ्रम ठरविणारा निश्‍चित आहे. मतमोजणीस तब्बल २२ दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत आपल्याकडे कोणाला फायदा, कोणाला तोटा, ही चर्चा होणार आहे. ४ जूनला जनतेचा फैसला कळणार आहे. तोपर्यंत ‘कमळ’ की ‘मशाल’ यांच्या विजयाबाबत अंदाज सुरूच राहणार आहे.