कासोद्यात कृत्रिम युरिया टंचाईचा पर्दाफाश; हजारो गोण्यांचा साठा जप्त, कृषी विभागाच्या कारवाईने खळबळ

फेब्रुवारी 20, 2026 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात युरियासह अन्य खतांचा कोणताही वास्तविक तुटवडा नसताना काही व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले आहे.

urea

याच दरम्यान, युरिया खताच्या टंचाईबाबत शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण पथकाने जळगाव जिल्ह्याच्या कासोदा (ता. एरंडोल) येथे धाड टाकून सहा दुकानांत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला. या कारवाईने खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisements

कासोदासह परिसरातील शेतकऱ्यांनी युरियासह अन्य खतांची मागणी केल्यानंतर तुटवटा भासवून लूट होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत १८ तारखेला कृषी विभागाचे पथक कासोद्यात दाखल झाले. संबंधित दुकानांची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणावर युरियाचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे पथकाने तातडीने पंचनामा सुरु केला आणि कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरु केली आहे.

Advertisements

या दुकानांची तपासणी

दरम्यान, कासोद्यात प्रवीण हार्डवेअर व कृषी केंद्र, आबासाहेब खंडेराव फ्रुटसेल सोसायटी, साई कृषी केंद्र, सुदर्शन कृषी केंद्र, गणेश पुंडलिक वाणी कृषी केंद्र, जाजू केंद्र या दुकानांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान, एका शेतकऱ्याने आधारकार्ड सादर करून युरियाच्या दोन गोण्या खरेदी केल्या. ही खरेदी प्रक्रिया ऑनलाईन असल्याने या पथकाने तातडीने शेतकऱ्याने घेतलेला युरिया आणि ऑनलाईन प्रक्रियेत असलेल्या नोंदीची पडताळणी केली. त्यात १६ गोण्यांची तफावत दिसून आली आहे.

शेतकऱ्याने दोन गोण्या घेतल्यानंतर त्याच्या आधारकार्डाच्या आधारे १८ गोण्या खरेदी केल्याची नोंद ऑनलाईन नोंदीत घेण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या आधारकार्डाच्या आधारावर खरेदीदाराला अंधारात ठेऊन ‘पॉस’ प्रणालीत १८ गोण्यांची नोंद करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या नावाने दर्शविण्यात आलेल्या अन्य १६ गोण्यांचा काळाबाजार करण्याचा घाट या विक्रेत्याने रचल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून या पथकाने संबंधित शेतकऱ्याचाही जबाब नोंदविला आहे.

दरम्यान, कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, युरियाचा पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now