बंदुकीचा धाक दाखवून तरुणाजवळील 12 लाखाची रक्कम लांबविली, जामनेर रोडवरील घटना
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही थांबताना दिसत नाहीय. यात जबरी चोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच आता बागेत पैसे घेऊन जाणाऱ्या तरुणाला दुचाकीने आलेल्या तिघांनी अडवत बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील १२ लाखाची रक्कम घेऊन फरार झाले. ही धक्कादायक घटना जामनेर रोडवरील महादेव माळ फाट्याजवळ घडलीय.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथून दुचाकीवर एक तरुण बॅग घेऊन जामनेरच्या दिशेने जात होता. दरम्यान तरुणाजवळ असलेल्या बॅगमध्ये रोकड असल्याची पाळत ठेवून तीन जण दुचाकीवर त्याचा पाठलाग करीत होते. जामनेरकडे जाणाऱ्या महादेव माळ फाट्याजवळ रस्त्यावर दुचाकी आडवी लावून तिघांनी गावठी पिस्तूल तरुणाच्या डोक्याला लावून त्याच्याकडून पैशाची बॅग हिसकावली व तेथून दुचाकीने पसार झाले. बॅगमध्ये अंदाजे १२ लाखांची रोकड होती.
ही घटना भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीत घडली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. या घटनेचा वरिष्ठ अधिकारी व पोलिस उपअधीक्षक कसून तपास करीत आहेत. अद्यापपर्यंत घटनेसंदर्भात कुठलीही सविस्तर माहिती न मिळाल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले.